Economy. अर्थव्यवस्था
भारतीय अर्थव्यवस्था बनली जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था लेखक प्रा. विनायक आंबेकर
ब्लूमबर्ग या आंतरराष्ट्रीय संस्थेने जाहीर केलेल्या अहवाला प्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. केंद्र सरकारने २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची माहित जाहिर केल्यानंतर हा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. भारताचा नोमिनल जीडीपी मार्च तिमाहीच्या शेवटच्या दिवशीच्या डॉलर विनिमय दराप्रमाणे ८५४.७ बिलियन डॉलर असून इंग्लंडचा याच तिमाहीचा नोमिनल जीडीपी ८१६ बिलियन डॉलर आहे. त्यामुळे आत्तापर्यंत सर्व जगातील अर्थव्यवस्थांमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्थेने पाचवा कार्मांक मिळवला आहे. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी ) २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १३.५ % दराने वाढले आहे. या मागे मुख्यत: भारतीय अर्थव्यवस्थेची मजबूत स्थिती आणि शेती, सेवा, बांधकाम उद्योग आणि खाजगी खर्चातील वाढ याचा मोठा वाटा आहे. भारतीय अर्थव्यवस्था या चालू वर्षात ७% दराने वाढेल असे अनुमान असून त्या दिशेने भारताची वाटचाल सुरु आहे. कोरोना महामारी नंतर सुरु झालेल्या रशिया युक्रेन मधील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ओईल आणि अनेक वस्तूंचे दर प्रचंड वाढले. त्यामुळे जगातील अनेक देशात महागाई दुपटीने वाढली असली तरी भारतातील महागाई फार नियंत्रणा बाहेर गेली नाही. चालू महिन्या पासून महागाई वाढीचा दर कमी व्हायला सुरुवात झालेली दिसते.
भारतीय अर्थव्यवस्था कोरोना नंतरच्या वर्षात जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली. या मागे मोदी सरकारने कोरोना काळात केलेले उत्तम आर्थिक नियोजन आणि भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यामध्ये लघु व मध्यम उद्योगांना तातडीचे अर्थ सहाय्य, महत्वाच्या उद्योग क्षेत्रासाठी लागू केलेली प्रोडक्शन लीन्कड इंसेटीव ( P L I ) योजना, डिफेन्स सहित सर्वच क्षेत्रामध्ये सुरु केलेलं आत्मनिर्भरतेचे उपाय, शेती व शेती पूरक उद्योगासाठी दिलेले अनुदान व त्याच वेळी देशातील गरीब वर्गा साठी सुरु केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने सारख्या अनेक योजना याचा महत्वाचा वाटा आहे. आजही क्रयशक्ती समानता ( Purchasing Power Parity PPP ) नुसार भारत जगात तिसया क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार ११ ट्रीलीयन डॉलर एव्हढा आहे. सर्व जगामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबुती बाबत खात्री आहे हे भारतात येणाया परकीय गुंतवणुकी मुळे आणि भारतिय आर्थिक बाजारात वारंवार येणा-या पैशाच्या ओघामुळे सिध्द झाले आहे.
याचवेळी एक विकसित देश असलेल्या इंग्लंडची अर्थव्यवस्था इंधन दरातील वाढ आणि उर्जा साधनांच्या तुटवड्याला तोंड देत आहे. शिवाय वाढती महागाई आटोक्यात आणणे इंग्लंडला शक्य झालेले नाही. या परिणाम स्वरूप इंग्लंडची अर्थव्यवस्था २०२२ च्या एप्रिल जून तिमाहीत ०.१% ने मंदावली आहे. २०२१ च्या दुसर्या तिमाहीच्या तुलनेत इंग्लंडची अर्थव्यवस्था २.९ % एव्हढीच वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर भारतासारख्या विकसनशील देशाने केलेली आर्थिक प्रगती निश्चितच प्रशंसनीय आहे.