भारतीय अर्थव्यवस्था वेगात. एप्रिल ते जूनच्या पहिल्या तीमाहित जीडीपी वाढीचा विक्रमी दर

Economy

भारतीय अर्थव्यवस्था वेगात. एप्रिल ते जूनच्या पहिल्या तीमाहित जीडीपी वाढीचा विक्रमी दर  लेखक प्रा.विनायक आंबेकर

दिनांक ३१ ऑगस्ट २०२१

भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ( GDP) सन २०२१-२२ च्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत चांगल्या  वेगाने वाढले आहे. गेल्या वर्षीच्या ४थ्या तीमाहीशी तुलना केल्यास हि वाढ १.६%दराने तर गेल्या वर्षीच्या एप्रिल ते जून या पहिल्या तीमाहीशी तुलना केल्यास हि वाढ २०.१ % इतकी आहे. आज केंद्र सरकारच्या सांख्यिकी तथा कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या एनएसओ विभागाच्या  वतीने हि आकडेवारी जाहीर करण्यात आली. चालू वर्षाच्या  पहिल्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन   सन २०११ च्या स्थिर दरा प्रमाणे ३२.३८ लाख कोटी रुपये एव्हढे झाले असून गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत ते २६.९५ लाख कोटी रुपये एव्हढे होते. त्यानुसार सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाढ हि २०.१ % एव्हढी येते. गेल्यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत हि वाढ उणे २४.४ % एव्हढी होती.

सन १९९० पासून दर तिमाहीच्या जीडीपी बाबत अधिकृत आकडे उपलब्ध आहेत. त्यानुसार हि आजपर्यंतची सर्वात वेगाने झालेली वाढ आहे.   सन २०२१-२२ च्या जीडीपीची तुलना सन २०२०-२१ च्या एप्रिल जून या तिमाहीच्या उत्पन्नाशी करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमुळे दिनांक २५ मार्च पासून कडक टाळेबंदी लावण्यात आली होती. या टाळेबंदीची मुदत ३० जून पर्यंत वाढत गेल्याने या तिमाहीत जीवनाश्यक वस्तू व औषधे वगळता देशातील अन्य सर्व प्रकारचे उद्योग व्यवसाय पूर्णत: ठप्प होते. त्यामुळे या तिमाहीचा जीडीपी सन १९-२० च्या एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत २४.४ %  टक्क्याने घसरला होता. या निगेटिव आकड्याशी तुलना होत असल्याने या तिमाहीचा जीडीपी जास्त दिसतोय  असा मुद्दा काही टीकाकार मांडत आहेत मात्र आपण या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये   देखील देशाच्या काही भागात काहीकाळ  पूर्ण व काही काल अंशत: टाळेबंदी होती हे लक्षात घेतले पाहिजे.

या शिवाय या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनाची सेक्टर प्रमाणे माहिती घेतल्यास हि वाढ खरी आहे हे लक्षात येते. घरेलू वस्तू वापर १९ टक्क्याने वाढला आहे व त्यामुळे ग्राहक मागणीत चांगली वाढ दिसते आहे. बांधकाम क्षेत्रात ६८% ने गतीविधी वाढली आहे. आयात व निर्यात क्षेत्रात चांगली वाढ दिसून येत आहे. या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत निर्यात ७.६८ लाख कोटी रुपये एवधी झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीतील निर्यात ५.५२ लाख कोटी रुपये एव्हढी होती. या वर्षीच्या पहिल्या तिमाहीतील आयात ८.३० लाख कोटी झाली असून गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीतील आयात ५.१८ लाख कोटी होती. सेक्टर प्रमाणे दिलेले सर्व  आकडे तपासले तर भारतीय अर्थव्यवस्था जवळपास कोविड महामारी पूर्वीच्या स्तरावर येऊन पोहोचत आहे हे स्पष्ट होते.

कोविडच्या पहिल्या लाटेनंतर मोदी सरकारने लगेचच दिलेले २० लाख कोटीचे आत्मनिर्भर पेकेज , १लाख ९० हजार कोटीची  गरीब कल्याण योजना आणि समाजातील गरीब देश बांधवाना दिलेली सर्वतोपरी मदत  या मुळे  टाळेबंदीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था टिकून राहिली आहे. आणि  दुसर्या लाटेत देखील पुन्हा वाढीव पेकेज आणि गरीबाना मोफत अन्नधान्य वाटप या सारख्या उपाय योजनांमुळे भारतीय अर्थव्यवस्था एव्हढ्या लवकर पूर्वपदावर येऊ शकली आहे. अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी त्या काळात भारतीय अर्थव्यवस्था व्ही शेप रिकव्हरी नक्की करणार आहे हे मोठ्या  आत्मविश्वासाने सांगितले  होते आणि त्या प्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्ववत करण्यात त्या यशस्वी झाली आहेत हे सर्वाना मान्य करावेच लागेल. अर्थातच  याप्रयत्नाला मिळालेले सर्व भारतीयांचे सहकार्य हे निश्चितच महत्वाचे आहे.

लेखक-प्रा विनायक आंबेकर

====  +  ====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *