Economy-अर्थव्यवस्था
रशियाचे युक्रेनवरील आक्रमण आणि अमेरिकेचे निर्बंध या मुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात लेखक प्रा विनायक आंबेकर
M Y Team दिनांक ९ मार्च २०२२
रशियाने युक्रेनशी युद्ध सुरु केल्याला दोन आठवडे उलटले आहेत. शेकडो निरपराध नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत तर लाखो नागरिक निर्वासित झाले आहेत. रशियावरील दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेकडून वेगवेगळे निर्बंध जारी करण्यात येत आहेत. त्यातील पहिला निर्बंध काही रशियन वित्त संस्थाना आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवहाराच्या स्विफ्ट सिस्टीम मधून वगळण्यात आले. दुसया निर्बंधाद्वारे रशियाच्या विविध देशात असलेल्या परकीय चलनाच्या ठेवी गोठवण्यात आल्या. त्यानंतर रशियाशी असलेले क्रीडा, व्यापार, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या विषयातील संबंध कमी करण्यात आले. रशिया या निर्बंधाना भिक घालत नाही असे लक्षात आल्यावर शेवटी अमेरिकेने रशियन अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या तेल व गेस विक्रीवर निर्बंध घातले. ८ मार्चला अमेरिकन प्रेसिडेंट जो बायडेन यांनी रशियाकडून तेल, गेस व उर्जा खरेदीवर बंदी घातली. जेव्हा रशिया कडून तेल, गेस खरेदीवर बंदी घातल्याची घोषणा केली त्या दिवशी आंतर राष्ट्रीय बाजारात ब्रेंट ओईलचे दर १२७ डॉलर प्रती बेरल पर्यंत वाढले होते. हे दर असेच वाढते रहाणार आणि लवकरच क्रूड ओईल चा दर २००८ ची आत्तापर्यंतची सर्वाधिक किंमत १४८ डॉलर प्रती बेरल पेक्षा कितीतरी पुढे जाईल असा बाजार विश्लेशकांचा अंदाज आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी सावधगिरीचा इशारा देताना जर रशियन तेल व वायू याची खरेदी थांबवली तर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचीकिंमत प्रती बेरल ३०० डॉलर पर्यंत जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात कच्चे तेल, गेस आणि उर्जेचे दर प्रदीर्घ कालावधीसाठी चढेच रहाणार आहेत.
रशिया हा जगातील तेल उत्पादक देशांपैकी महत्वाचा देश आहे. जगातील एकूण कच्चे तेल व तेलापासूनच्या उत्पादना पैकी ७% उत्पादन रशियात होते. रशिया दररोज ७० लाख बेरल क्रूड निर्यात करते. अनेक युरोपियन देश या उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणावर रशियावर अवलंबून आहेत. रशियावर घालण्यात येणाया निर्बंधा मधून उर्जा क्षेत्र वगळण्यात आलेले होते. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठ्याच्या व्यवस्था कोलमडल्यामुळे त्याचा पुरवठा कमी होऊन भाववाढ झाली आहे. या सर्वांच्या एकत्रित परिणामाने युरोपियन देशामध्ये प्रचंड भाववाढ होण्याची दाट शक्यता तयार झाली आहे. ऊर्जाक्षेत्रातील भाववाढ पहाता नजीकच्या काळातील उर्जेची गरज भागवण्या करीता मोठा अर्थ पुरवठा लागेल असे गृहीत धरून युरोपियन युनियन मोठ्या रकमेची रोखे विक्री करण्याचे नियोजन करीत आहेत.
एकंदरीत अमेरिका व सध्या तरी त्यांच्या बरोबर असलेले युरोपीयन देश यांनी रशियावर घातलेल्या आर्थिक निर्बंधाचे काही विपरीत परिणाम जसे रशियावर दिसतात त्याच बरोबरीने अमेरिका व युरोपियन देश व भारतासहित जगातील बहुतांश देशांवर कमीजास्त प्रमाणात दिसून येत आहेत. कोरोना महामारीमुळे डबघाईला आलेल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था आत्ता नुकत्याच सावरू लागलेल्या होत्या त्याच वेळी अंतरराष्ट्रीय बाजारात उर्जा आणि वस्तू ( कमोडीटी ) यांच्या वाढलेल्या किमतींनी सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांवर भाववाढीचा ताण पडत आहे. बाजारातील महागाई दर्शवणारा अमेरिकेतील उपभोक्ता मूल्य सूचकांक ( CPI) फेब्रुवारी मध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ७.९% एव्हढा वाढला आहे. त्यामुळे अमेरिकेत प्रचंड महागाई वाढली असून मुद्रास्फितीजन्य मंदी येईल अशी दाट शक्यता आहे.
थोडक्यात रशियाला त्यांनी युक्रेनवर केलल्या आक्रमणाबद्दल केली जाणारी शिक्षा हि रशिया बरोबरच सर्व जगभराच्या आधीच मोडकळीला आलेल्या अर्थव्यवस्थेला धोका पोहोचवत आहे. शिवाय या मुळे रशिया आणि चीन यांची मैत्री व आर्थिक सहयोग वाढण्याची देखील शक्यता आहे. ओपेक या जगातील तेल उत्पादक कंपन्यांच्या संघटनेने हे स्पष्ट केले आहे कि राशियाकडून होणारा दररोज ७० लाख बेरलचा तेल पुरवठा बंद केल्यास तेव्हढा पर्यायी तेलपुरवठा करण्याची क्षमता अन्य कोणत्याही देशात नाही.
अमेरिकेने केलेल्या तेल खरेदी बंदीच्या निर्णयाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर देखील दिसून आला. जगभरातील शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर पडले. शेअर बाजारातील अस्थिरतेने जगभरातील बाजारात सोन्याचे भाव मात्र चांगले वाढले. सर्वसाधारणत: युध्दजन्य परिस्थितीत सोने हि सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. कच्चे तेल, गेस व उर्जा संसाधना बरोबरच वस्तू म्हणजे कमोडीटीच्या किमती देखील प्रचंड वाढल्या आहेत. आणि अमेरिका युरोप मधील देश आणि भारता सारखे तटस्थ देशांपुढे सुद्धा भाववाढीचे संकट आ वासून उभे आहे. त्यामुळे रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण आणि अमेरिकेने रशियावर घातलेले निर्बंध यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक वेगळीच विशेष अनिश्चितता आलेली आहे असे मत आंतरराष्ट्रीय नाणे निधीने व्यक्त केले आहे.