Modi Magic
“हर घर तिरंगा” अभियान- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील जन अभियान
लेखक प्रा. विनायक आंबेकर
१५ ऑगस्ट २०२२ रोजी भारत स्वतंत्र झाल्याला ७५ वर्षे पूर्ण होतील. या निमित्ताने मोदीजीनी गेले वर्षभर या “आझादी का अमृतमहोत्सव” चे अभ्यासपूर्ण नियोजन केले आहे. संपूर्ण वर्षभर देशभरात या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. त्या साठी विविध स्तरातील व्यक्ती, संस्था आणि संघटना यांच्याशी संपर्क करून त्याचे नियोजन केलेले आहे. देशातील सर्व जनतेमध्ये विशेष करून युवावर्गा मध्ये देशप्रेम जागृत करणे आणि त्याना देशाच्या विकासात संमिलीत करून घेणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या वर्षीचा स्वातंत्र्यदीन देशाच्या सर्व जनतेने घरोघर म्हणजेच आपापल्या घरी राष्ट्रध्वज फडकावून साजरा करावा या उद्देशाने मोदी सरकारने सर्व राज्य सरकारे, स्थानीक स्वराज्य संस्था, सर्व सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने भव्य असे “ हर घर तिरंगा” अभीयान जाहीर केले आहे. सर्व सामान्य परिस्थितीत राष्ट्रध्वजाच्या वापरा बद्दल अनेक वेगवेगळे नियम लागू होतात व त्याचा भंग केल्यास शिक्षा होरू शकते. मात्र या हर घर तिरंगा अभियानाच्या साठी केंद्र सरकारने या सर्व नियमामध्ये या वर्षासाठी काही आवश्यक असे बदल केले आहेत आणि काही सुचना दिल्या आहेत त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे.
– या पूर्वी राष्ट्रध्वजाशी आपला संबंध नेहमी औपचारिक पद्धतीने व कोणत्या तरी संस्थेमार्फत येत होता. या वर्षी हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आपण आपल्या घरी मुक्तपणे तिरंगा फडकवावा असे सरकारचे आवाहन आहे. दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ असे तीन दिवस आपल्या घरावर तिरंगा ध्वज उभारायचा आहे. या साठी केंद्र सरकारने संबंधित नियमात बदल करून हि परवानगी देशवासियांना दिलेली आहे.
– या वर्षी पर्यंत सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या राष्ट्रध्वजा बाबत तो सुर्यास्तापूर्वी काढून घ्यायचे असलेले बंधन हर घर तिरंगा अभियानात आपल्या घरी लावलेल्या राष्ट्र्ध्वजा बाबत लागू असणार नाही.फ्लाग कोड ऑफ इंडिया या २००२ पासून लागू झालेल्या अधीनियमानुसार पूर्वी राष्ट्रध्वज सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच फडकावता येत असे. यावर्षी आपण सलग तीन दिवस दिवस रात्र राष्ट्र ध्वज फडकवू शकतो.
– या नियमानुसार वापर झाल्यानंतर राष्ट्रध्वज त्याचा अवमान होणार नाही या पद्धतीने सुरक्षित ठेवावा असा नियम होता. यावर्षी या नियमामध्ये थोडासा बदल करून राष्ट्रध्वज सुरक्षित ठेवावा किंवा त्याची योग्य विल्हेवाट लावावी. यामध्ये सदर राष्ट्रध्वज कच-यामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता तो खाजगीरीत्या सुरक्षितपणे जाळून टाकावा अशी सुचना दिलेली आहे.
– यापूर्वी राष्ट्रध्वज फक्त कॉटन, सिल्क, लोकर आणि खादी तेही फक्त हातकताई केलेले व हातांनी विणलेल्या कापडापासून मशीनवर शिवलेले ध्वज वापरण्यास परवानगी होती. या वर्षी पोलीएस्टर व मशीनमेड कापडापासून बनवलेले ध्वज वापरण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र यानिमित्ताने माझा सर्वाना आग्रह हाच आहे कि फक्त आपल्या देशात बनवलेले राष्ट्रध्वज वापरावे चीनी बनावटीचे राष्ट्रध्वज वापरू नयेत.