अर्थव्यवस्था Economy
भारतीय शेअर मार्केट मधील तेजी पहिल्यांदाच भारतीयांच्या बळावर लेखक विनायक आंबेकर
आजच्या शेअर मार्केट सेशनमध्ये भारतीय शेअर मार्केट मधील निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स हे तीनही इंडेक्स आजपर्यंतच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले होते. या आधी जेव्हा जेव्हा हे इंडेक्स असे त्यावेळपर्यंतच्या उच्चांकी आकड्यावर पोहोचले होते तेव्हा ती वाढ जागतिक विशेषत: अमेरिकन शेअर बाजारातील तेजीला अनुसरून आणि FII ( Foreign Institutional Investors ) च्या वाढलेल्या खरेदीमुळे असायची. मात्र आज तुम्ही पाहिले असेल तर जागतिक विशेषत: अमेरिकन युरोपियन शेअर बाजारात फार तेजी नाही आणि आशियातील काही शेअर बाजाराततर मंदीचे वातावरण होते. FII नी देखील भारतीय बाजारात फार मोठी खरेदी केलेली नाही. म्हणजेच आजचा भारतीय शेअर मार्केट मधील उच्चांक हा पूर्णत: भारतीय गुंतवणूकदारांच्या बळावर गाठलेला आहे.
या परिस्थितीचे विश्लेषण करताना दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात येतात. पहिली गोष्ट कोरोना काळातील लॉकडाऊन मध्ये भारतीय शेअर बाजारातील डीमेट खाती मोठ्या संख्येने वाढलेली होती. आणि दुसरी गोष्ट त्यानंतर शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या आणि त्यांनी केलेली गुंतवणूक देखील वेगाने वाढत होती. या सर्वाचे क्रेडीट तुम्ही मोदीना द्या किंवा देऊ नका पण डिजिटल इंडिया मुळे देशभरात वाढलेले ओनलाईन व्यवहार आणि मोदी सरकारच्या उत्तम अर्थव्यवस्थापनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची कोरोनामधील लॉकडाऊन नंतर झालेली भरभराट याचाच हा परिणाम आहे हे नक्की.
या मुळे भारतीय शेअर मार्केट मध्ये गेल्या काही महिन्यापासून FII नि बाजारात केलेल्या विक्रीचा नकारात्मक आणि त्यांनी केलेल्या विक्रीचा सकारात्मक परिणाम फारसा होत नाही. या बरोबरीने भारतीयांनी म्युच्युअल फंडात देखील विक्रमी गुंतवणूक केलेली असल्याने DII ( Domestic Institutional Investors ) देखील सातत्याने भारतीय बाजारात मोठी गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे गेले काही महिने जेव्हा FII मोठ्या प्रमाणावर विक्री करतात तेव्हा DII तेवढ्याच प्रमाणात खरेदी करून शेअर बाजार कोसळणार नाही अशी काळजी घेताना दिसतात. आल्या आहेत. किरकोळ गुंतवणूकदार हा देखील सातत्याने मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करीत आहेत.
भारत एक बलशाली अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे असे म्हणणारांसाठी आजचे उच्चांक हे डोळ्यात अंजन घालणारे आहेत. हे उच्चांक भारतिय अर्थव्यवस्थेच्या सुदृढ असण्याचा एक पुरावाच आहेत.
=====