Economy अर्थव्यवस्था
देशातील महागाईवाढीला नफेखोरीमुळे झालेली महागाई ( Greedflation ) किती कारणीभूत आहे ?
लेखक विनायक आंबेकर दिनांक १५ ऑगस्ट २०२३
केंद्र सरकारच्या सांख्यिकी कार्यालयाने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाई जुलै महिन्यात ७.४४ % ने वाढलेली आहे. या वाढीमध्ये भाज्या, डाळी, कडधान्ये, मसाले, दुध आणि दुग्धजन्य पदार्थ यांच्या किमतीत झालेली वाढ मोठया प्रमाणावर कारणीभूत आहे. किरकोळ महागाई दरात झालेली हि वाढ सुमारे १५ महिन्यांनी या पातळीवर पोहोचली आहे. या आधी एप्रिल २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर वाढून ७.७९% वर पोहोचला होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून जाहीर केला जाणारा किरकोळ महागाई दर ( Retail Inflation Rate ) हा आकडा देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील परिवारांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना लागणा-या वस्तूंच्या दारात झालेली वाढ लक्षात घेऊन दरमहा बनवला जातो. येथे विशिष्ट वस्तूंच्या दरात झालेली वाढ लक्षात घेतलेली असते. रिझर्व बँकेने घालून दिलेल्या जास्तीत जास्त ६% पर्यंतच्या भाववाढीच्या टार्गेट पेक्षा हि भाववाढ निश्चित जास्त आहे. लॉकडाऊन नंतरच्या काळातील टार्गेटपेक्षा जास्त भाववाढ होण्याची ही तिसरी वेळ आहे. नुकत्याच झालेल्या मोनिटरी पोलिसी कमिटीच्या मिटिंगमध्ये पुढील वर्षातील महागाईच्या दराचा अंदाज वाढवून ५.१ % वरून ५.४% करण्यात आला होता. त्यावेळी या कमिटीने अन्नपदार्थांच्या दरात झालेली वाढ लक्षात घेऊनच आपला अंदाज दुरुस्त केला होता. त्या मुळे महागाई वाढणार याचा अंदाज याचा अंदाज सर्वाना पहिल्या पासून होताच.
सर्व साधारणत: जुलै महिन्यात किरकोळ महागाई दर वाढलेला असतो. जुलै २०२२ मध्ये तो ६.७१% होता. त्यानंतर कमी होऊन जून २०२३ मध्ये तो ४.५५ % होता. पावसाळ्याच्या सुरुवातीला भाज्यांच्या दरात होणारी वाढ हि त्याला करणीभूत असते. या वर्षी टोमेटोच्या दरात झालेली वाढ हि महागाईदरातील वाढीला कारणीभूत ठरली आहे. भाज्या आणि डाळी यांच्या दर वाढीमुळे घाऊक महागाई दरात देखील वाढ झालेली आहे. आज प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोडी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात देखील वाढत्या महागाईच्या दराची दखल घेतली असून आपले सरकार या महागाईवाढीवर शक्य ते सर्व उपाय करेल असे आश्वासन त्यांनी देशवासियांना दिलेले आहे.
या निमित्ताने अर्थ व्यवस्थेमधील एका नव्या धोक्याकडे लक्ष वेधले गेले आहे. या धोक्याला अर्थशास्त्रीय भाषेत नाफेखोरीमुळे झालेली महागाई ( Greedflation ) असे म्हटले जाते. कंपन्यांच्या नाफेखोरीमुळे झालेल्या महागाईचा मुद्दा जगभरातील अनेक देशांमध्ये समोर येत आहे. अमेरिका आणि ब्रिटन सहित अनेक देशातील अर्थतज्ञ या बाबत वारंवार चेतावणी देत आहेत. भारतातही काही वस्तूंच्या बाबत विशेष करून औषधे, डाळी आणि खाद्य तेलांच्या बाबत प्राप्त परिस्थितीचा फायदा या क्षेत्रातील कंपन्या घेतात का हे पहाणे गरजेचे ठरेल. शेतमालाच्या विशेषत: डाळी आणि तेलबियांच्या बाबत मालसाठा करून ठेवून किमती वाढवण्याची परंपरा देशातील अनेक भागात गेली अनेक वर्षात आहेच. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किमती उतरल्यावर देखील देशातील खाद्य तेल कंपन्यांनी आपल्या किमती बरेच दिवस कमी केलेल्या नव्हत्या. शेवटी केंद्र सरकारने त्याना आदेश देऊन त्या कमी करायला लावल्या होत्या. त्यामुळे या पुढील काळात वाढत्या महागाई विरुध्च्या लढ्यात हा मुद्दा देखील महत्वाचा रहाणार आहे. या महिन्यातील भाववाढीला कारणीभूत असलेला देशातील कमी पावसाचा मुद्दा दूर झाल्यावर पुढील महिन्यांमध्ये भाववाढ कमी होईल अशी आशा बाळगूया.
====