The Great Indians महान भारतीय
पद्मश्री विभूषित शिक्षक सुजित चटोपाध्याय
M Y Team दिनांक ३ जुलाय २०२२
“ज्या दिवशी मला माझी पदव्युत्तर पदवी मिळाली, मी एक मिनिटही वाया घालवला नाही – मी शिक्षक होण्यासाठी माझ्या गावी, प. बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यातील ऑस्ग्रामला परत आलो.” श्री सुजित चट्टोपाध्याय यांची हि पथदर्शी कहाणी आहे. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर मोठ्या शहरातील नोक-यांच्या ऑफर धुडकावून लावून ते आपल्या खेड्यामध्ये परत आले. तेथे रामनगर उच्चमाध्यमिक विद्यालय येथे नोकरी स्वीकारली. त्याकाळात त्याना शहरांतील शाळांकडून जास्त पगाराच्या ऑफर होत्या, पण फक्त १६९ रु. पगारावर त्यांनी त्यांच्या गावात नोकरी स्वीकारली कारण त्याना गावातील विद्यार्थ्यांना शिकवण्याची तीव्र इच्छा होती कारण तिथल्या विद्यार्थ्याना चांगल्या शिक्षकाची सर्वात जास्त गरज होती.
त्यांनी त्यांच्या शाळेत ३९ वर्षे शिकवले आणि ते निवृत्त झाले. पण निवृत्ती नंतरचा वेळ साखरेचा चहा पिण्यात आणि सोफ्यावर वेळ घालवत न घालवता त्यांनी आत्मचिंतन केले आणि समाजातील वंचित घटकांमधील मुला मुलीना अल्प मोबदल्यात शिकवण्याचे ठरवले. एके दिवशी सकाळी ६.३० च्या सुमारास ३ तरुण मुलीं त्यांच्या घरी आल्या. हे शिक्षक निवृत्त झालेले त्याना कळले आणि त्या २३ किलो मीटर वरून सायकल चालवत त्याना मोठ्या अपेक्षेनेभेटायला आल्या होत्या. त्या तरुण आदिवासी मुली होत्या ज्यांना शिकण्याची जिद्द होती. हात जोडून त्यांनी विचारले, ‘मास्तरजी, तुम्ही आम्हाला शिकवाल का?’ सुजितजीनि लगेच होकार दिला आणि म्हणाले ‘मी तुम्हाला शिकवू शकतो, पण तुम्हाला माझ्या वर्षभराची फी भरावी लागेल- तुम्ही द्यायला तयार आहात का?’ त्या म्हणाल्या ‘हो, मास्तरजी, आम्ही पैसे कसे तरी मॅनेज करू.’ त्यावर सुजितजीनी त्याना फक्त वार्षिक १ रुपया फी भरायला सांगितले आणि त्याना शिकवायचे ठरवले. त्या मुली प्रचंड खुश झाल्या. त्यानंतर ते आपया जुन्या शाळेत गेले आणि त्यांनी या मुलीना शिकवण्यासाठी एका वर्गाची मागणी केली. त्या शाळेने त्याना वर्ग देण्यास नकार दिला. मग त्यांनी आपल्या घराचा व्हरांडा साफ केला आणि तेथेच त्यांनी शाळा सुरु केली. “ सदाई फकिरेर पाठशाला” या त्यांच्या शाळेत आता वर्षाला ३००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
सन २००४ मध्ये सुरु झालेल्या या शाळेत जास्तकरून तरुण आदिवासी मुली आहेत. हि शाळा सकाळी ६.३० वा सुरु होऊन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालते. शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली तरी शाळेने वार्षिक फी फक्त १ रुपयावरून २ रुपये एव्हढीच वाढवली आहे. या शाळेत आजही २० किलोमीटर वरून चालत येणा-या मुली आहेत. या शाळेतील विद्यार्थी प्राध्यापक, विभागप्रमुख आणि आयटी व्यावसायिक बनले आहेत. ते नेहमी आपल्या मास्टर मोशायना फोन करून आपल्या यशाच्या कहाण्या सांगतात. भेटीला येणारे विद्यार्थी अनेक भेटी घेऊन येतात पण मास्टर मोशाय त्यांच्या कडून फक्त काही चॉकलेट देण्यास सांगतात जी त्याना सध्या शाळेत येणाया मुलाना वाटता येतात.
सन २०२१ मध्ये मोदी सरकारने सुजित चट्टोपाध्याय याना पद्मश्री सन्मानाने गौरवान्वीत केले आहे. आपल्या निवृत्ती नंतर आपले निजी जीवन न जगता समाजातील वंचित विद्यार्थ्याना मोफत शिक्षण देण्याचे श्री सुजित चट्टोपाध्याय यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याना पद्मश्री सन्मान जाहीर झाल्यावर सगळ्या गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला मात्र त्या दिवशी देखील त्यांची शाळा सुरु होती. राष्ट्रपती कोविंद यांनी श्री सुजित चटर्जी यांना साहित्य आणि शिक्षणासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये पद्मश्री प्रदान केले.