Modi Magic
भारताची राजकीय संस्कृती बदलणारा महानायक– श्री नरेंद्र मोदी ( भाग-१ ) लेखक प्रा विनायक आंबेकर
स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या राजकीय संस्कृतीचे काही महत्वाचे टप्पे पडतात. साधारणत: पहिले २८ वर्षे म्हणजे इंदिरा गांधीनी आणीबाणी लागू करण्या पर्यंतचा काळात भारताची राजकीय संस्कृती नेहरू गांधी घराण्याच्या भोवती घोटाळत होती. त्या काळात नेहरू गांधी घराणेशाहीची, व्यक्ती पूजनाची संस्कृती होती. राज्यात आपले ऐकणारा माणूस मुख्यमंत्री नेमायचा आणि सर्व निर्णय आपण दिल्लीत घ्यायचे असे एका व्यक्तीभोवती केंद्रित राजकारण त्या टप्प्यात भारतात चालू होते. स्वत:ची सत्ता वाचवायला इंदिरा गांधीनी भारतावर आणीबाणी लादली आणि हे घराणे स्वत:च्या सत्तालालसेपायी भारतीय लोकशाहिचा गळा घोटायला देखील तयार आहे हे भयानक सत्य भारतीय जनतेसमोर आले. मग त्यावेळी स्थापन झालेल्या सर्व विरोधी पक्षांच्या मिळून बनलेल्या जनता पक्षावर भारतीय जनतेने विश्वास टाकला. नेहरू गांधी घराणेशाहीची निर्विवाद सत्ता संपुष्टात आली.
या नंतरचा टप्पा हा साधारणत: १९७७ ते १९९९ या वीस वर्षाचा कालखंड आहे. भारतीय जनतेने या काळात वेगवेगळ्या राजकीय प्रयोगांना निर्णायक प्रतिसाद दिला. इंदिरा गांधी यांच्या दुर्दैवी हत्येनंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी नवख्या राजीव गांधीना एव्हढी सहानभूती दिली कि अटलबिहारी वाजपेयींनी त्याचे वर्णन “यह लोकसभा नही यह तो शोकसभा है.” असे करावेसे वाटले. मात्र याच राजीव गांधींवर बोफोर्स प्रकरणात गंभीर आरोप झाल्यावर याच जनतेने त्याना नाकारायला मागे पुढे पाहिले नाही. या टप्प्यात भारतीय राजकारणात एक महत्वाचा बदल झाला ज्यामध्ये प्रसार माध्यमांची राजकारणावरील पकड वाढली. बोफोर्स प्रकरणातील प्रसार माध्यमांच्या मार्फत तयार झालेला दबाव राजीव गांधीना जेव्हा पराभूत करू शकला तेव्हा पासून भारतीय राजकारणातील प्रसार माध्यमांचे महत्व प्रचंड वाढले. एका अर्थाने या काळात प्रसारमाध्यमांमुळे जनमत मोठया प्रमाणावर प्रभावित होण्याची संस्कृती भारतामध्ये आली. याच टप्प्यात नंतरच्या काळात पी व्ही नरसिंह राव यांच्या सरकारने भारताच्या अर्थव्यवस्थेला नेहरू गांधी परिवाराच्या तथाकथित समाजवादी अर्थव्यवस्थेतून मुक्त करून उदारीकरणाचा व खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.
या नंतरचा टप्पा हा १९९९ ते २०१४ हा आहे. यातील पहिल्या पाच वर्षात जनतेने भारतीय जनता पार्टीच्या व अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएवर विश्वास टाकून त्याना सत्ता दिली. एका अर्थांने जनतेने घराणेशाही झुगारून दिली आणि सर्वसामान्यातून पुढे आलेल्या नेत्याकडे देशाचा कारभार सोपवला. प्रसार माध्यमांचे जनमतावरील वर्चस्व टिकून असल्याने या काळात प्रसारमाध्यमे हे एक महत्वाचे राजकीय हत्यार म्हाणून वापरण्याची नवीन संस्कृती भारताच्या राजकारणात सुरु झाली. याच टप्प्यात गुजरात मध्ये नरेंद्र मोदी यांचा उदय झाला होता आणि आणि त्यांनी प्रयत्न पूर्वक त्या राज्याच्या राजकारणावर पकड मिळवली होती. २००४ ते २०१४ या युपिए सरकारच्या काळात देशातील राजकारणात पुन्हा एकदात घराणेशाहीचा काळ आला, फक्त आता आता सर्व प्रादेशिक पक्षांची विशेष करून कॉंग्रेस, द्रमुक, राजद, राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा पक्षांची सामुहिक घराणेशाही आली. आपल्या नियंत्रणात काम करणा-या कळसूत्री बाहुल्याना पुढे करून आपल्याला सोयीचे राजकारण करण्याचा प्रघात देशात सुरु झाला. त्यालाच उघडपणे “हायकमांड कल्चर” म्हणून राजमान्यता देण्यात आली. या गठबंधनात समविष्ट पक्ष हे आपल्या मर्जी प्रमाणे आणि आपल्या हितसंबंधांचे राजकारण करीत होते, त्यामुळे प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि देशाच्या हिताचे कोणतेही निर्णय झाले नाहीत. सत्ता हि पैसे मिळवण्यासाठीच असते अशी संस्कृती देशात निर्माण झाली. वंशवादी पक्षांची ताकद वाढली.
या पुढचा टप्पा श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री पदाच्या ८ वर्षांचा आहे. श्री मोदींनी भारतीय राजकारणात काही नवीन मापदंड स्थापित केले आहेत. राजकीय नेतृत्वाच्या व्यक्तिगत आचरणाबाबत मोदीनी स्वत:वर कठोर निर्बंध घालून एक आदर्श स्थापित केला आहे. त्यांचा पहिला नियम राजकीय नेतृत्वाच्या स्वच्छ भ्रष्टाचार विरहीत आचरणाचा आहे. राजकीय नेतृत्वाने मिळालेल्या पदापासून कोणताही व्यक्तीगत आर्थिक लाभ घ्यायचा नाही आणि नातेवाईकाना द्यायचा नाही हे त्यांनी करून दाखवले आहे. आपली आई सोडता आपल्या भावा बहिणींशी वा कुटुंबाशी त्यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून सर्व संबंध कठोर पणे तोडले. आई सोडता त्यांनी कोणत्याही नातेवाईकाला आजपर्यंत आपल्या सरकारी निवास स्थानात प्रवेश दिला नाही. त्यांचा दुसरा नियम त्यांच्या भोजनाच्या खर्चासहित त्यांचे सर्व व्यक्तिगत खर्च ते त्यांच्या पगारातून करतात. १० लाखाचा सुट एका मतदाराने दिला तो काही दिवस वापरल्यावर त्यांनी त्याना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंचा ते नियमित लिलाव करतात त्यात जमा केला आणि तो एक कोटीला विकला जाऊन ते पैसे सामाजिक कार्याला देण्यात आले आहेत. मिळालेल्या भेट वस्तूच्या लिलावातून आज पर्यंत सुमारे ३०० कोटी रुपये त्यांनी सामाजिक कामाला मिळवून दिले आहेत. भारताने वर्षानुवर्षे सरकारी बंगल्यांमध्ये सरकारी खर्चाने रहाणारे नेहरू गांधी कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक बघितले आहेत त्या पार्श्वभूमीवर हे निर्णय फार वेगळे आहेत. आपल्या सहका-यांनी हेच नियम पाळावेत असा त्यांचा आग्रह असतो. कुटुंबवत्सलता हि घराणेशाहीचे आणि भ्रष्टाचाराचे मूळ असते हे लक्षात घेऊन अनेक राज्यांचे मुख्यमंत्री नेमताना त्यांनी संसारात न अडकलेल्या स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीना प्राधान्य दिल्याचे आपण पाहिले आहे. राजकारण्याना सत्तेसाठी पैसा आणि पैश्यासाठी सत्ता या चक्रातून बाहेर काढण्याचे महत्वाचे काम श्री मोदींनी केले आहे.
पद स्वीकारल्यावर राजकीय नेत्यांनी चोवीस तास पूर्ण झोकून देऊन काम करून जनतेची सेवा केली पाहिजे हा त्यांचा तिसरा नियम आहे. त्यासाठी गेले २० वर्षे ते स्वत: एकही सुट्टी न घेता दररोज किमान १६ ते १८ तास काम करतात. सत्तेची पदे मिरवण्यासाठी नसून त्या पदावरील व्यक्तीने ती मोठी जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन काम केलेलं पाहिजे हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले आहे. भारतीय राजकारणात त्यांनी घडवलेला चौथा महत्वाचा बदल प्रसार माध्यमाविषयी आहे. भारतीय राजकारणाच्या मधल्या टप्प्यांमध्ये प्रसार माध्यमांनी देशाच्या राजकारणावर आपला प्रभाव वाढवून राजकारणाचा अजेंडा सेट करण्या पासून ते राजकिय निर्णय प्रभावित करण्यापर्यंतची संस्कृती उभी केली होती. या लॉबीमध्ये व्यक्तिगत अजेंड्याला प्राधान्य आणि व्यक्ती/संस्थांचे आर्थिक हीतसंबंध व देशविदेशातील राजकीय शक्तींचे दबाव महत्वाची भूमिका निभावत होते. श्री मोदींनी या देशविरोधी शक्तीना फार हुशारीने नेस्तनाबूत केले. आपल्या सर्व कार्यक्रमांचे प्रसारण हक्क फक्त सरकारी प्रसिद्धी यंत्रणेकडे देऊन त्यांनी या लॉबीचे महत्व कमी करून टाकले. जनतेशी समाज माध्यमातून ( सोशल मिडीया ) तेव्हढाच प्रभावी संपर्क स्थापित करता येतो हे भारतीय राजकारणात प्रथम त्यांनी सिध्द केले आणि आजही ते आपल्या मिनिटा मिनिटाचा हिशोब जनतेला या माध्यामातून देतात. ट्वीटरवरील सर्वात जास्त फोलोअर असलेले ते पहिले भारतीय नेते आहेत.
नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रचलित राजकीय संस्कृतीमध्ये केलेला आणखी एक महत्वाचा बदल हा वंशवादी प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाच्या मर्यादा त्यांनी देशाच्या जनतेसमोर उघड करून दाखवल्या. केवळ घराणेशाहीमुळे पक्षातील किंवा सरकारमधील सर्वोच्च पदावर हक्क सांगणारी व्यक्ती हि भारतीय जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकणार नाही तर स्वत:च्या कर्तुत्वाने राजकारणात पुढे आलेली व्यक्तीच देशाला नेतृत्व देऊ शकते हे त्यांनी सिध्द केले. भारतातील वंशवादी पक्ष लगेच नाहीसे होतील असे नक्कीच होणार नाही पण जनता या पुढे घराण्याला नव्हे तर कर्तुत्वाला पाहून मत देईल एव्हढे नक्की.
( क्रमश: )