भारताची राजकीय संस्कृती बदलणारा महानायक- श्री नरेंद्र मोदी ( भाग-२ )

Modi Magic

भारताची राजकीय संस्कृती बदलणारा महानायक- श्री नरेंद्र मोदी

( भाग-२ ) लेखक प्रा विनायक आंबेकर

भारतातल्या लहान मोठया सर्व राजकीय पक्षात पक्षातील नेत्यांच्या व्यक्तीपुजेची संस्कृती रुजलेली आहे. प्रत्येक राजकीय पक्षात विविध नेत्यांचे स्वतंत्र गट आहेत. पक्षाचे कार्यकर्ते पक्षाच्या विचारधारेपेक्षा त्यांच्या नेत्यांवर निष्ठा ठेवून असतात. ते नेतेही आपापल्या पाठीराख्यांचा सांभाळ करण्यास आणि त्यासाठी वेळ प्रसंगी पक्षाचे आदेश धाब्यावर बसवण्यास तयार असतात. आपल्या पाठीराख्याना पदे मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील एका दिग्गज नेत्याने मुळ पक्षाच्या नेतृत्वावर विदेशी नागरिकत्वाचा आरोप करून वेगळा पक्ष काढला आणि नंतर त्याच “ विदेशी” नेतृत्वाबरोबर हात मिळवणी करून आपल्या पाठीराख्यासहित सत्ता उपभोगलेली पण आपण पाहिलेली आहे. श्री नरेंद्र मोदीनी ही व्यक्तीपुजेची पध्दत आपल्या पक्षात कमी व्हावी यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत. अशा व्यक्तीपूजेला असलेला  आपला विरोध त्यांनी वेळोवेळी उघडपणे मांडला आहे.

भारतातील बहुतेक सर्व राजकीय पक्षात सरकारी आणि संघटनात्मक पदे “मिळवली किंवा वाटली” जातात. सर्व नियुक्त्या व निवडीचे  निर्णय अन्य राजकीय पक्षात व्यक्तीच्या आवडीनुसार केले जातात, म्हणजेच व्यक्ती केंद्रित असतात. श्री मोदींनी  व्यक्तींच्या आवडीनुसार सरकार किंवा पक्षातील पदावरील नियुक्त्या करणे त्याना  अजिबात मान्य नाही हे त्यांच्या वर्तनातून, बोलण्यातून आणि निर्णयातून अनेकवेळा स्पष्ट केले आहे. त्यांच्या प्रधानमंत्रीपदाच्या कार्यकाळात मंत्रीपदावर आणी राष्ट्रपती आणि राज्यपाल नियुक्त खासदार आणि आमदार या पदांवर त्या पदांची आणि पक्ष संघटनेची गरज पाहून नियुक्त्या केल्या गेल्या आहेत, व्यक्तींच्या इच्छे नुसार केलेल्या नाहीत. या आठ वर्षात सरकारी  पदे मिळालेल्या बहुतेक राजकीय कार्यकर्त्यानी आपली निवड झाल्याचे आपल्याला अगदी ऐन वेळेला कळले हे जाहीररीत्या सांगीतलेले आपण अनेकवेळा ऐकेलेले आहे. या निर्णय प्रक्रीयेत त्या पदासाठी योग्य व्यक्तीची निवड केली जाते व्यक्तीसाठी पद शोधले जात नाही. श्री मोदींचे निर्णय व्यक्ती सापेक्ष नसून उद्दिष्ट सापेक्ष असतात असे मला वाटते. मोदींचे निर्णय व्यक्तीसापेक्ष  नसतात याचा दुसरा पुरावा त्यांनी नियुक्त केलेल्या कोणत्याही  व्यक्तीने त्याच्या कडून अपेक्षित काम केले नाही तर त्याची नियुक्ती रद्द केली जाते  हा देखील आहे. या व्यक्ती निरपेक्ष धोरणाचे  चांगले परिणाम भाजपाला  गेल्या काही वर्षात सर्वदूर मिळालेल्या यशामध्ये दिसून आले आहेत.

व्यक्तीपूजेच्या विरुध्द असलेल्या श्री मोदीना स्वत:ची व्यक्ती पूजा आवडते का? हा प्रश्न स्वाभाविकपणे तुमच्या मनात आला असेल. यावर हे लक्षात घ्यावे लागेल कि  स्वत:च्या वाढदिवसाला त्यांनी आजपर्यंत कोणताही कार्यक्रम किंवा समारंभ होऊ दिलेला नाही. एका आयटी कंपनीत तिथल्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात त्याना विचारले गेले  कि “ भारताच्या इतिहासात तुमचा उल्लेख कसा व्हावा असे तुम्हाला वाटते?”  त्यावर त्यांनी दिलेले उत्तर फार महत्वपूर्ण आहे. ते म्हणाले “ भारताच्या इतिहासात या कार्यकाळात भारताने काय प्रगती केली ते लिहिले जावे, तो भारताचा इतिहास असेल. असे अनेक नरेंद्र मोदी येतील आणि जातील पण देशाने केलेली प्रगती हाच देशाचा इतिहास असला पाहिजे.” त्यांच्या बोलण्यावर विश्वास  ठेवायचा नसेल तर त्यांनी गेल्या आठ वर्षात घेतलेले अनेक  धाडसी राजकीय व आर्थिक निर्णय त्यांची मनोभूमिका दर्शवतात. आज पर्यंत भारतातील प्रत्येक राजकीय नेता स्वत:च्या जनमानसातील प्रतीमेबाबत कायम काळजी घेत आलेला आपल्याला दिसतो. आपल्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून या सर्व नेत्यांनी अनेक  धाडसी निर्णय घ्यायला टाळाटाळ केलेली दिसून येते. मात्र श्री नरेंद्र मोदींसाठी राष्ट्रहीत सर्वतोपरी असल्याने त्यांनी गेल्या आठ वर्षात स्वत:च्या प्रतिमेचा विचार न करता देशहिताचे अनेक धाडसी राजकीय व आर्थिक निर्णय घेतले. या निर्णयामुळे झालेली विरोधकांची जहरी टीका आणि स्वत:ची  व्यक्तिगत टिंगलटवाळी त्यांनी तेवढ्याच शांतपणे सहन केली. राष्ट्रहितासाठी निर्णय घेताना त्यांनी स्वत:च्या व्यक्तिगत प्रतिमेचा कधीच विचार केला नाही. भारतीय राजकारणातील व्यक्तीपूजेची संस्कृती कमी करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या आचरणाने  आदर्श घालून दिला आहे.

भारताच्या आजपर्यंतच्या राजकीय संस्कृतीत राजकीय नेतृत्व हे वेगवेगळ्या योजना कल्पना रुपात  मांडत असे आणि त्यानुसार सरकारी अधिकारी योजना तयार करून  त्या योजनांची अंमलबजावणी आपल्या हाता खालच्या कनिष्ठांकडून करून घेत असत. राजकीय नेते फक्त उद्घाटनापुरते त्या योजनेत सहभाग नोंदवत असत. श्री नरेंद्र मोदीनी  आपल्या कल्पनेने ज्या नवनवीन योजना मांडल्या त्या योजनांच्या प्रत्येक टप्प्यात त्यांचा क्रियाशील सहभाग त्यांनी ठेवलेला आहे. त्यांनी आणलेल्या  सर्व योजनांच्या  मागे पूर्णत्वाने विचार, एकात्मिक नियोजन आणि  जोरदार अंमलबजावणी नक्की असते. शिवाय प्रचलित राजकीय संस्कृतीनुसार योजना सुचवून न थांबता ते त्याच्या अंमलबजावणीत स्वत: सहभागी होतात एव्हढेच नव्हे तर सर्व निर्वाचित प्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी याना देखील सहभागी करून घेतात. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी ग्रामीण भागातील मुलांनी शिक्षणाकडे वळावे म्हणून “ शाळा प्रवेशोत्सव” हे अभियान सुरु केले. दरवर्षी जून महिन्यामध्ये ते स्वत: तीन दिवस दूरवरच्या ग्रामीण भागातील खेडयात स्वत: जाऊन रहात असत आणि घरोघर जाऊन शाळेत जाण्यायोग्य वयाच्या मुलाना जवळच्या शाळेत घेऊन जाऊन तिथे प्रवेश घ्यायला लावत असत. याच वेळी ते राज्यातील सर्व राजपत्रित अधिकारी,  सर्व निर्वाचित लोकप्रतिनिधी  याना देखील या अभियानात सहभाग घ्यायला लावत असत.  गुजरातचे मुख्यमंत्री असताना प्रत्येक वर्षी त्यांनी आपला प्रत्यक्ष सहभाग न चुकता दिला. त्यांच्या नंतर देखील गुजरातचा आजवरचा प्रत्येक मुख्यमंत्री  व शिक्षण मंत्री दरवर्षी उत्साहाने हे अभियान चालवीत आहे.

Leading by example ची हि संस्कृती मोदींनी भारतीय राजकारणात जवळपास प्रत्येक क्षेत्रात रुजवली आहे. या विलक्षण नेतृत्वाच्या कार्याचे अजूनही अनेक पैलू आहेत.  साधारणत: कोणत्याही समाजात किंवा देशात जो पर्यंत एखादी व्यक्ती सतत कार्यरत रहाते तेव्हा त्याच्या कार्याचे यथार्थ मूल्यमापन होत नाही. भारतीय राजकारणात श्री मोदींनी न कळत आणलेल्या बदलांचे महत्व काही काळानंतर जनतेला निश्चितपणे समजेल. ( समाप्त )

लेखक- प्रा.विनायक आंबेकर

======

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *