समृद्धी महामार्ग- महाराष्ट्राच्या विकासाचा राजमार्ग. ले.प्रा.विनायक आंबेकर

Expert Opinion-विशेषग्य राय

समृद्धी महामार्ग- महाराष्ट्राच्या विकासाचा राजमार्ग.  ले.प्रा.विनायक आंबेकर

Dt. 11th December 2022

आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमध्ये महाराष्ट्राच्या अविकसित भागाच्या विकासासाठी या महामार्गाची कल्पना सुचली. त्यांनी अत्यंत परिश्रम पूर्वक त्याचे खास मोदी स्टाईलने नियोजन केले आणि अत्यंत परिश्रम पूर्वक नियोजन करून  व सर्व विरोधाला तोंड देऊन आपल्या पहिल्या कार्यकालात या रस्त्याच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली.  मधल्या अडीच वर्षाच्या काळात या महामार्गाचे काम थोडे फार रेंगाळले असले तरीही पुन्हा सत्तेवर आल्यावर देवेन्द्र्जीनी त्या कामाला पुन्हा वेग दिला आणि आज त्याचे औपचारिक उद्घाटन केले. आज या महामार्गाचा  नागपूर ते शिर्डी हा ५२० किलोमिटरचा पहिला टप्पा जनतेला समर्पित करण्यात आला असून तो  आजपासून वापरात आला आहे. दुसरा टप्पा शिर्डी ते मुंबई असा असून तो २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. हा महामार्ग एकूण ७०१ किलोमीटर लांबीचा असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा तर्फे बांधण्यात आला आहे. महाराष्ट्रातील १० जिल्हे, २४ तालुके आणि ३९२ खेड्यातून हा महामार्ग प्रत्यक्ष जाईल. शिवाय याच्या पूरक रस्त्यांच्या जाळ्यामुळे महाराष्ट्रातील आणखी १४ जिल्हे या मार्गाला जोडले गेले आहेत. या महामार्गामुळे नागपूर व रस्त्यातील सर्व जिल्ह्यातील उद्योगांना मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत  थेट मालवाहतूक सुविधा उपलब्ध होत आहे. शिवाय या महामार्गावर असलेल्या जोडरस्त्यांमुळे एकूण भारतभरातील २४ महत्वाच्या महामार्गांशी हा महामार्ग जोडला जात आहे. या भव्य प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा व देशाचा नक्की फायदा काय? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकाच्या मनात नक्कीच येतो त्या साठी काही माहिती.

गेल्या आठ वर्षात मोदींनी पायाभूत सुविधा विकास प्रचंड प्रमाणात केला आहे. गेल्या आठ वर्षात पायाभूत सुविधांवर त्यांनी सुमारे १लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.   मोदीनी देशाच्या आर्थिक विकासासाठी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर लगेचच पायाभूत सुविधांच्या विकासाच्या भव्य योजना हाती घेतल्या. पायाभूत सुविधांच्या विकासाचा त्यांचा दृष्टीकोन फार व्यापक आणि अनेक उद्दिष्टे साध्य करणारा आणि विकासाच्या अनेक अंगांना स्पर्श करणारा आहे. मोदीन्च्या मते पायाभूत सुविधा म्हणजे केवळ सिमेंट आणि काँक्रीटची बांधकामे नाहीत. त्यांच्या मते पायाभूत सुविधा उज्वल भविष्याची हमी देतात. पायाभूत सुविधा लोकाना जोडतात.  पायाभूत सुविधांच्या विकासावर भरपूर खर्च करण्यामागे मोदीन्चा दुहेरी हेतू आहे. पायाभूत सुविधांची कामे सुरु केल्यावर प्रथम कामगार, बांधकाम साहित्य, बांधकाम साहित्य वाहतूक सेवा, मशिनरी भाडयाने देण्याची सेवा,  अन्य विविध सेवा यांची मागणी वाढते आणि मोठ्याप्रमाणावर रोजगार तयार होतो. शिवाय पायाभूत सुविधा तयार झाल्यावर त्या भागातील व्यापार उद्योगाला चालना मिळून तेथील अर्थव्यवस्था वाढण्यास मदत होते. अर्थशास्त्रातील परिभाषेत पायाभूत सुविधावरील खर्चाच्या अर्थव्यवस्थेवरील होणाया या सकारात्मक परिणामाला मल्टीप्लायर इफेक्ट असे म्हणतात. रिझर्व बँकेच्या अभ्यासानुसार पायाभूत सुविधांवर जर एक रुपया खर्च केला तर  त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये २.५ ते ३.५ रुपयांचे उत्पन्न तयार होते. हा मुद्दा लक्षात घेऊनच भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगती साठी मोदींनी गेल्या आठ वर्षात भरपूर खर्च केला आहे.

पायाभूत सुविधा विकासावर जास्त खर्च केल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाची गती वाढते हे जगभरात सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रत्येक देश पायाभूत सुविधांच्यावर जास्तीत जास्त खर्च करत असतो. सन २०१८ मध्ये डोनाल्ड ट्रंप यांच्या सरकारने अमेरिकेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. २०२० साली झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पायाभूत सुविधामधील गुंतवणूक हा बायडन यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा केंद्रभूत मुद्दा होता. निवडून आल्यावर जो बायडन सरकारने सादर केलेया अमेरिकन जोब प्लान आणि अमेरिकन फेमिली प्लान   या दोन्ही मधे पायाभूत सुविधावर भरपूर गुंतवणूक करण्यात येत  आहे.

मोदींचा हाच दृष्टीकोन लक्षात घेऊन मा. देवेंद्र फडणवीस यानी २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी उपयुक्त ठरेल असे नियोजन सुरु केले. त्यामध्ये त्याना पूर्ण महाराष्ट्राला जोडणारा हा महामार्ग सुचला. याचे नियोजन करताना केवळ महामार्ग असे केलेले नसून त्या सोबत महाराष्ट्रातील सुमारे २४ जिल्ह्यांचा विकास होण्यासाठी आवश्यक असे अन्य प्रकल्प या महामार्गाशी जोडलेले आहेत. या माहामार्गावर दोन टप्प्यामध्ये १९ नवीन शहरे बांधण्यात येणार आहेत. या शहरांचे नाव कृषी समृद्धी नगर असे असेल. त्यातील पहिल्या टप्प्यात ७ आणि दुसया टप्प्यामध्ये ११ शहरे बांधण्यात येणार आहेत. या शहरात शाळा, तंत्रशिक्षण संस्था ( I T I ), व्यवसाय प्रशिक्षण संस्था, उच्च शिक्षण संस्था, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, बगीचे, मैदाने अशा त्या त्या भागासाठी आवश्यक असलेल्या सुविधा देण्यात येतील.

या कृषी समृद्धी केंद्रामध्ये शेतमाल प्रक्रिया उद्योजक आणि गुंतवणूकदार याना विशेष सुविधा देण्यात येतील. त्यामुळे या  महामार्गाला लागून विशिष्ट उद्योगांची क्लस्टर तयार होणार आहेत. त्या मुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. हा महामार्ग नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई या तीन महानगराना थेट जोडत आहे.  यामुळे शेतमालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. या महामार्गाला जवळपासचे १४ जिल्हे पुरक  मार्गाने ( Feeder Routes ) जोडले गेल्याने त्या जिल्ह्यातील शेतमालाला सुद्धा बाजारपेठ उपलब्ध होईल.  या शिवाय पर्यटकांसाठी या महामार्गाने महाराष्ट्राच्या अंतर्भागात असलेल्या पर्यटन स्थळांची सफर सुद्धा सुविधाजनक होणार आहे.

एकंदरीत महाराष्ट्राच्या अविकसित भागाला महाराष्ट्राच्या विकसित अशा पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा हा महामार्ग महाराष्ट्रात समृद्धी आणण्यात नक्कीच यशस्वी होईल यात शंका नाही. मा देवेंद्र फडणवीस यांनी योजलेल्या महाराष्ट्राची प्रगती करण्याच्या अनेक प्रकल्पापैकी एक भव्य प्रकल्प प्रत्यक्षात उतरवून त्यांनी आपण विकासाचे स्वप्न  प्रत्यक्षात उतरवू  शकतो हे दाखवून दिले आहे.

=====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *