२००० च्या नोटा व्यवहारातून बाहेर काढण्याबाबत काही प्रश्नांची उत्तरे.

Expert Opinion विषेशग्यराय

२००० च्या नोटा व्यवहारातून बाहेर काढण्याबाबत काही प्रश्नांची उत्तरे.                          लेखक विनायक आंबेकर, अर्थविश्लेषक

२००० रुपयांच्या नोटा का छापण्यात आल्या होत्या त्याची माहिती- या पूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जी नोटबंदी जाहीर करण्यात आली होती त्या मध्ये जुन्या १००० रुपये आणि ५०० रुपयांच्या नोटा त्या दिवशी रद्द करण्यात आल्या होत्या आणि रद्द झालेल्या जुन्या  नोटा विशिष्ट कालावधीमध्ये बदलून घ्यायच्या होत्या. त्या मुळे ती नोटबंदी जाहीर करताना रिझर्व बँकेच्या आकडेवारीनुसार त्यावेळी ज्या किमतीच्या १००० व ५०० च्या जुन्या नोटा चलनात वापरात होत्या तेव्हढ्या किमतीच्या  नव्या नोटा छापून तयार ठेवणे बंधनकारक होते.  नोटबंदीचा निर्णय होण्याआधी जी तयारी करण्यात आलेली असेल त्या मध्ये उपलब्ध कालावधीत तेव्हढ्या रकमेच्या नवीन ५०० रुपयांच्या नोटा छापणे शक्य नाही असे लक्षात आल्याने पर्याय म्हणून रुपये २००० या रकमेच्या नोटा पहिल्यांदाच छापण्यात आल्या. त्या वेळीच हे गोष्ट जाहीर करून या २००० रुपयांच्या  नोटा ठराविक काळासाठी आहेत हे स्पष्ट करण्यात आलेले होते. त्या नुसार आता या २००० रुपयांच्या नोटा २३ सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेत जमा करून त्या बदल्यात अन्य नोटा घ्यायच्या आहेत. सरळ साध्या असणा-या या गोष्टी बाबत काही प्रश्न जनतेच्या मनात आहेत किंवा काही गैरसमज मुद्दामहून पसरवले जात आहेत त्याबाबत स्पष्टीकरण  पुढील प्रमाणे आहे.

– आत्ता रिझर्व बँकेने १९ मे २०२३ रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे  २००० च्या नोटेवर बंदी घातलेली नाही. फक्त २३ सप्टेंबर २०२३ पर्यंत या नोटा बँकेतून दुसया रकमेच्या नोटात बदलून घ्यायच्या आहेत.  २३ सप्टेंबर २०२३ नंतरदेखील  हि नोट कायदेशीर चलन रहाणार आहे. त्या मुळे मोदी सरकारने पुन्हा नोटबंदी आणली हा प्रचार खोटा आहे.

– २००० च्या नोटा बदलण्यासाठी सर्व बँकांमध्ये सोय केलेली आहे. आपण आपल्या बँकेतील नेहमीच्या  खात्यात या नोटा भरू शकता. त्यावर कोणतीही रकमेची मर्यादा घातलेली नाही. आपले खाते नसलेल्या  आपल्या घराजवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन,  एक फॉर्म भरून देऊन आपण एका वेळेला २००० च्या १० नोटा बदलून घेऊ शकता. २०००० हि रकमेची मर्यादा बँकेच्या सोयी साठी ठेवली आहे. आपणाकडे कितीही रकमेच्या २०००च्या नोटा असल्या तरी त्या बदलून मिळू शकतात. अर्थात याचे बँकेत रेकॉर्ड होणार असल्याने इन्कमटेक्स कायद्याने आपल्या उत्पन्नाचा हिशोब देण्याची आपली जबाबदारी कायम आहे.

– मार्च २०१७  पासून रिझर्व बँकेने २००० च्या नोटा छापण्याचे बंद केलेले आहे. त्या मुळे व्यवहारात असलेल्या २००० च्या नोटा जीर्ण झाल्या होत्या. त्या मुळे रिझर्व बँकेने आपल्या क्लीन नोट पोलिसीनुसार या नोटा बदलल्या असे स्पष्ट केले आहे. सर्व साधारणपणे कोणतीही नोट ४ ते ५ वर्षे कालवधी पर्यंत वापरण्यायोग्य असते असे रिझर्व बँकेचे म्हणणे आहे.

– २०१६ च्या नोटबंदीनंतर मोदी सरकारने नियोजनपूर्वक डिजिटल व्यवहार वाढवण्याचा प्रयत्न केला असून त्याला भरपूर यश मिळाले आहे. सध्या साधारणपणे एकूण व्यापारी व्यवहाराच्या ९३% व्यवहार हे डिजिटल पद्धतीने होतात असा अंदाज आहे. त्यामुळे प्रत्यक्षात अत्यंत कमी झालेल्या रोखीच्या व्यवहाराची या नोटा व्यवहारातून काढल्याने फार अडचण होणार नाही हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

– जास्त किमतीची नोट चलनात असेल तर तिचा वापर प्रत्यक्ष व्यवहारासाठी कमी होतो आणी काळ्या पैशाची साठवणूक करण्यासाठी ती जास्त वापरली जाते हा जगभरातील अनुभव आहे. त्या मुळे मार्च २०२३ मध्ये वापरात असलेल्या ३ लाख ६२ हजार कोटी रुपये किमतीच्या २००० च्या नोटा या दैनदिन व्यवहारापेक्षा दडवून ठेवण्यासाठीच जास्त वापरल्या जातात असा अंदाज आहे. या निर्णयामुळे त्या वापरात येतील, मुख्य अर्थव्यवस्थेत येतील अशा एक कयास बांधला जात आहे. या मुळे काळा पैसा साठवून ठेवण्याचे काम अधिक अवघड होईल आणि त्या मुळे काळ्या पैशावर अधिक  नियंत्रण येईल अशी आशा आहे.

– या नोटा रद्द करायच्या होत्या तर छापल्या का? हा प्रश्नच  चुकीचा आहे. आपल्या  देशात मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात १०००० रुपयांच्या नोटा देखील अस्तित्वात होत्या आणि त्यांनी त्यावेळी नोटबंदी करून त्या रद्द केल्या होत्या हा इतिहास आहे. त्या मुळे चलन नियंत्रणाच्या कामाच्या गरजे प्रमाणे असे निर्णय वेळोवेळी रिझर्व बँक घेत असते. एक नागरिक म्हणून आपण बँकेला सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे.

– या निर्णयामुळे छोटे व्यापारी, हातगाडीवाले, पथारीवाले यांचे पूर्वीच्या नोटबंदी प्रमाणे आर्थिक नुकसान होईल हा आरोप साफ खोटा आणि चुकीचा आहे. कारण या प्रकरणात कोणतीही नोट बंद करण्यात आलेली नाही. शिवाय सुमारे ४ महिन्याची मुदत २०००च्या नोटा बदलायला दिलेली आहे त्या मुळे कोणताही व्यापार व व्यवहार या निर्णयामुळे अडणार नाही. उलट दडवून ठेवलेल्या नोटा व्यवहारात आल्याने व्यापाराला चालना नक्की मिळेल.

– अन्य काही आरोप पूर्णत: राजकीय व खोडसाळपणाचे  असल्याने त्याला उत्तर दिलेले नाही.

=======

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *