राष्ट्रीय नव उद्योग- स्टार्टअप दिवस १६ जानेवारी प्रा विनायक आंबेकर

Atmanirbhar Bharat

राष्ट्रीय नव उद्योग- स्टार्टअप दिवस १६ जानेवारी.   

लेखक- प्रा विनायक आंबेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय  ‘स्टार्ट-अप’ दिवस म्हणून घोषित केला  आहे. नरेंद्र मोदिनी १५ ऑगस्ट २०१५ रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात भारतातील युवकांच्या बुद्धिमत्तेला वाव देणारा स्टार्टअप इंडिया हि योजना सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. सर्व बाबींची पूर्तता करून त्यांनी  १६ जानेवारी २०१६ रोजी स्टार्टअप इंडिया एक्शन प्लान घोषित केला व हि योजना सुरु केली. या योजनेचे पहिला सुलभीकरण आणि मार्गदर्शन, दुसरा वित्तपोषण आणि उत्तेजन -प्रोत्साहन आणि तिसरा उद्योग आणि शिक्षण व्यवस्था यांची भागीदारी आणि नवीन स्टार्ट अप जन्माला घालणे असे तीन मुख्य भाग केले आहेत. या योजनेत एकूण १९ प्रत्यक्ष कार्य करण्याचे मुद्दे  ( Action Points ) निश्चित केले आहेत.मोदी सरकारने सरकारी मंत्रालये, गुंतवणूकदार, प्रस्थापित उद्योग आणि विद्यापीठे व महाविद्यालये या सर्वांची मिळून एक परिसंस्था ( Ecosystem) तयार केली आणि स्टार्टअप याक्षेत्राला चालना दिली. सरकारने  स्टार्ट अप इंडिया हब या पोर्टलची निर्मिती या योजनेसाठी केली आहे. उद्योजक,गुंतवणूकदार, पालक ( Mentors), सुविधा पुरवणारे सरकारी विभाग असे  सर्व स्टेक होल्डर्स या पोर्टलवर एकमेकांशी थेट संपर्क करू शकतात.

स्टार्टअपची सुरुवात नाविन्यपूर्ण कल्पना सुचलेल्या व्यक्ती पासून होते. स्टार्टअप इंडिया योजनेत नोंदणी केल्यावर त्या व्यक्तीला त्याची कल्पना प्रत्यक्षात कशी आणता येईल या बाबत  ४ आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्या व्यक्तीची नोंदणी करून त्याला स्टार्टअपचा दर्जा दिला जातो. त्यानंतर त्या स्टार्टपला गुंतवणूकदार, पालक, इंडस्ट्री सपोर्ट आणि वेळोवेळी मार्गदर्शन दिले जाते.   नरेंद्र मोदीन्च्या प्रयत्नाला यश येऊन देशातील युवकांनी आणि अन्य स्टेकहोल्डरनी  या योजनेला भरघोस प्रतिसाद दिला. या योजनेच्या पहिल्या पाच वर्षात  या योजने मध्ये मध्ये ४१३१७  स्टार्टअप ची नोंदणी झाली आणि  ३९००० स्टार्टअप मध्ये ४ लाख ७० हजार लोकाना रोजगार मिळाले. या योजने अंतर्गत सुरु केलेल्या फंड ऑफ फंड या निधी मधून एकूण ३८४ स्टार्टअपना ४५०९ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले गेले. गेल्या सात वर्षात या स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या नोंदणी फी मध्ये सवलत, प्रत्यक्ष करातील सवलती, जेम पोर्टल वर नोंदणी आणि सरकारी खरेदी मध्ये प्राधान्य असे या योजनेला बळ देणारे अनेक उपाय मोदी सरकारने केले. त्यामुळे भारतात गेल्या ७ वर्षात स्टार्टअप हि संकल्पना रुजली आणि वागाने वाढली आहे.

२००४ ते २०१४  या काळात एक महान अर्थतज्ञ  आपले पंतप्रधान असूनही दरवर्षी फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतके स्टार्टअप  भारतात निर्माण झाले होते. मात्र  २०१४ ला मोदीनी सत्ता हातात घेतल्यावर स्टार्ट अप इंडिया, स्टेन्ड अप इंडिया  आणि मेक इन इंडिया अशा नवीन संकल्पना आणून देशातील युवकांना नोकरी करणारे न होता नोकरी  देणारे व्हा असे आवाहन  केले आणि योग्य ते आर्थिक आणि सरकारी मदतीचे व योजनांचे पाठबळ दिले आणि त्यामुळे देशात ५० हजारावर नवीन स्टार्टअप भारतात सुरू झाले आहेत. नवीन स्टार्टअप तयार होण्याच्या आणि वाढण्याच्या बाबतीत भारत आज जगात तिस-या स्थानावर पोहोचला आहे. भारतात गेल्या काही वर्षात स्थापन करण्यात आलेले असंख्य  स्टार्टअप यशस्वी होऊन त्यांचा व्यवसाय वेगाने वाढला आहे.

जगभरातील स्टार्टअप क्षेत्रामध्ये मध्ये ज्या स्टार्टअपचे बाजरमूल्य  १ ते १० बिलियन अमेरिकन डॉलर असते त्या स्टार्टअपला ‘युनिकॉर्न’ हा दर्जा दिला जातो. एक बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास साडे सात हजार कोटी रुपये. १० बिलियन डॉलर च्या वर मुल्यांकन गेल्यास त्याला सुपर युनिकोर्न असे  म्हणतात. २०१४-२१  पर्यंत भारताने सर्व युरोपियन देशांना मागे टाकत आतापर्यंत एकूण ५४  युनिकॉर्न निर्माण केले आहेत. २०२१ या एकाच वर्षात  मध्ये भारतातील ४३ स्टार्टअपचे मुल्यांकन साडे सात हजार कोटीच्या वर जाऊन ४३ युनिकॉर्न भारतात तयार झाले आहेत. क्रिकेट मधील टीम स्पोन्सर करणारा बायजू “BYJU” हा एक असाच यशस्वी झालेला स्टार्टअप आहे. त्याचे बाजारमूल्य २२  बिलियन डॉलर्स म्हणजे दीड लाख कोटी रुपयांच्या वर आहे. आज बंगळुरू जगाचे ‘स्टार्ट-अप कॅपिटल’ बनत आहे.भारतीय स्टार्टअप व्यावसायिकांनी अंदाजे १५  लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या कंपन्या व २०  लाखाच्या वर नवीन रोजगार निर्माण केले आहेत. आता मोदी सरकारने नव्याने ५०००० अधिकृत स्टार्टअपची नोंदणी करण्याचे लक्ष्य ठेवले असून त्या दृष्टीने मोदी सरकारने स्टार्ट अप चळवळीकडे भारतीयांचे लक्ष्य वेधन्या साठी १६ जानेवारी हा दिवस  “नवउद्योग दिवस” स्टार्ट अप दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.

स्टार्टअप चळवळ आणि त्याला मिळालेले प्रचंड यश हा मोदी सरकारच्या यशस्वी आर्थिक धोरणांचा एक ठोस पुरावा आहे. मोदी सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या निर्मिती संकल्पनेत स्टार्टअप चळवळीचे मोठे योगदान रहाणार आहे.

लेखक प्रा. विनायक आंबेकर

=======

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *