आर्थिक सर्वेक्षण २०२३ लेखक प्रा.विनायक आंबेकर

Economy अर्थव्यवस्था

आर्थिक सर्वेक्षण २०२३  लेखक प्रा.विनायक आंबेकर

दिनांक १ फेब्रुवारी  रोजी सादर होणाया अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला आज अर्थमंत्र्यांनी संसदेत आपला आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार  श्री. नागेश्वरन यांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार करण्यात आला आहे. या आर्थिक सर्वेक्षणात गेल्या वर्षभरात भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध अंगांचे सर्वेक्षण करून त्यांची परिस्थिती मांडली जाते. या सर्व क्षेत्रांतील प्रगतीचा व कामगिरीचा आढावा घेऊन त्यावरून आगामी वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती कशी राहील याचा अंदाज दिला जातो. या वर्षीच्या आर्थिक सर्वेक्षणातील काही महत्वाचे मुद्दे ज्यांच्या आधारे आपली अर्थव्यवस्था सुदृढ असून जगाला भेडसावणाया मंदीच्या संकटाला भारतीयांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही अशी आपली खात्री पटते ते पुढील प्रमाणे.

– चालू वर्षी सकल राष्ट्रीय उत्पादनाचा वाढीचा दर ( GDP growth rate ) ७% राहील आणि पुढील आर्थिक वर्ष २०२३-२४ साली भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ६ ते ६.८ % या दरम्यान राहील. हा विकास दर रिअल ग्रोथ रेट असून नॉमिनल ग्रोथ रेट ११% असेल असा अंदाज आहे.

– रुपयाचे डॉलरशी अवमूल्यन हि समस्या आगामी वर्षात देखील कायम राहील. इतर देशाच्या चलनांच्या डॉलरशी होणा-या अवमुल्यनाच्या तुलनेत रुपया बराच मजबूत असला तरीही अमेरिकन फेडने व्याजदरात वाढ केल्यास त्याचा परिणाम रुपयावर दिसेल.

– आगामी वर्षात शीर्ष भाववाढ ( Headline Inflation ) ६.८% राहील असा अंदाज रिझर्व बँकेने दिला आहे. हा भाववाढीचा दर रिझर्व बँकेने घालून दिलेल्या ६% च्या दर मर्यादेपेक्षा जास्त असला तरीही काहीही कठोर उपाय योजावेत अशी गरज वाटत नाही.

– वित्तीय तूट हा काळजीचा मुद्दा असला तरीही केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मध्यम मुदतीच्या वित्तीय धोरणानुसार वित्तीय तूट मर्यादेत ठेवणे केंद्र सरकारला शक्य आहे.

– जागतिक बाजारातील सद्य स्थिती पहात चालू खात्यावरील वाढती तूट देखील पुढील वर्षी कायम राहील. वस्तूंच्या वाढत्या किमती आणि जागतिक मंदीमुळे थंडावलेली निर्यात याचा तो परिणाम आहे. कच्च्या तेलाच्या किमती मर्यादेत राहिल्यास त्यात सुधारणा होईल.

– सार्वजनिक बँकांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. त्यामुळे बँकांनी लघु आणि मध्यम उद्योगांना देण्यात आलेल्या कर्जात यावर्षी ३०.६% वाढ झाली आहे.

– केंद्राच्या रस्ते आणि महामार्गातील भांडवली गुंतवणूक एप्रिल ते नोव्हेंबर २२ दरम्यान १ लाख ४९ हजार कोटी रुपये तर रेल्वे मधील भांडवली गुंतवणूक याच काळात १ लाख १५ हजार कोटी रुपये झाली आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत  रस्त्यामधील गुंतवणूक १०२% तर रेल्वे मधील गुंतवणूक ७६.६५% नि वाढली आहे.

– औषध उद्योगातील थेट परकीय गुंतवणूक सप्टेंबर २२ पर्यंत १ लाख ६३ हजार कोटी रुपयांच्या आसपास झाली आहे. थेट परकीय गुंतवणुकीत गेल्या ५ वर्षात चारपट वाढ झाली आहे. महामारीची तीव्रता कमी झाल्यावर औषध उद्योगाची वाढ मंदावली आहे. इतर उद्योगांची स्थिती सुधारत आहे.

– आपला देश आता जगातील कच्च्या लोखंडाच्या उत्पादनात दुस-या क्रमांकावर पोहोचला आहे. या क्षेत्राचे कामकाज या वर्षी उत्तम झाले असून देश लोखंडाच्या अंतिम वस्तूंच्या उत्पादनात देखील प्रगती पथावर आहे.

– आपल्या देशातील शेती व शेती पूरक उद्योग गेली काही वर्षे उत्तम कामगिरी करीत आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या पीके व पशुपालन यातील उत्पादन वाढवण्यासाठी केलेल्या उपाय योजना, पीएम किसान, पीक विमा, किसान क्रेडीट कार्डाच्या माध्यमातून दिलेला अर्थपुरवठा, शेतमालाच्या आधारभूत किमतीतील वाढ अशा योजनांचा परिणाम आता दिसू लागला आहे. येत्या काही काळात आपला देश शेतमालाच्या निर्यातीत अग्रेसर राहील. आपल्या देशातील सुमारे ६०% जनता रोजगारासाठी शेतीवर अवलंबून असल्याने हि गोष्ट आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फार उपयुक्त ठरली आहे.

=====

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *