आखाडा-मोदी सरकारचा कार्यक्षम कारभार

Modi Magic -मोदी कि जादू

आखाडा    लेखक सचिन दहिभाते ( फेसबुक वरुन  साभार )

M Y Team दिनांक २८ मार्च २०२२

आखाडा हे एक सुमारे ३५० लोकवस्तीचे अतिशय दुर्गम पण निसर्गसौंदर्याने नटलेले पालघर जिल्ह्यातील शेवटच्या टोकाचे आदिवासी गाव. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६८ वर्षांनी म्हणजेच सन २०१५ मध्ये या गावात वीज आली आणि प्रगतीची स्वप्ने आखाडकर बघू लागले. २०१६ च्या दिवाळीच्या सुट्टीत या गावातील विद्यार्थ्यांसाठी १० दिवसांचे मोफत प्राथमिक संगणक प्रशिक्षण देण्याचे मी ठरविले. गावातील चौथी पासून ते कॉलेज करणारी सुमारे ३० विद्यार्थी प्रशिक्षणासाठी मोठ्या उत्साहाने तयार झालीत. दि.५/११/२०१६ ला विक्रम शेलार या माझ्या माजी विद्यार्थ्यासह आखाडा गावात कॉम्प्युटर घेऊन पोहोचलो. सुभाष गावित यांच्या घरी कॉम्प्युटर ठेवण्याची व्यवस्था केली होती. संध्याकाळपर्यंत कॉम्प्यूटर इन्स्टॉलेशन , टेस्टिंग, वेळापत्रक, बँचेसचे नियोजन झाल्यानंतर सर्व विद्यार्थांना दुसऱ्या दिवशी वेळेवर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. आता प्रशिक्षणाची जवळपास सर्व तयारी झाली होती, उद्या प्रशिक्षणाला सुरवात होणार या आनंदात आम्ही सर्व जण असतांनाच रात्री गावातील वीज गेली.

येईल थोड्या वेळानी ….ते … उद्या सकाळपर्यंत वीज नक्की येईल अशा आशेवर गावकऱ्यांनी मला ठेवलं. दुसरीकडे सुभाष गावितचे फोनवर प्रयत्न चालूच होते. सकाळ झाली. ठरल्याप्रमाणे प्रशिक्षणासाठी मुलं आलीत मात्र लाईट काही आले नाहीत. पहिला दिवस विद्यार्थांशी ओळख, कॉम्प्यूटरची ओळख, प्रकार भागांची नांवे, उपयोग इ. मध्ये गेला पण मीटर वरचा लाल दिवा काहीकेल्या लागत नव्हता. सुभाष गावित डीपी असलेल्या गावी जाऊन आला, डीओ गेला आहे असे नवीन कारण समोर आले. आता उद्या काय? असा भयावह प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला, कारण विजेशिवाय कॉम्प्यूटर म्हणजे शाई शिवाय पेन. एव्हाना माझ्या स्मार्टफोनच्या बँटरीनेही हात वर केले होते.

दुसरा दिवस उजाडला तरीही विजेची नाराजी दूर झाली नव्हती, पण प्रशिक्षण आणि विद्यार्थांचा हुरूप दोन्ही मला टिकवून ठेवायचं होतं. झालेल्या अभ्यासक्रमाची उजळणी, कीबोर्डची ओळख, सीपीयू उघडून दाखवून हार्डवेअरची ओळख अश्यात दुसराही दिवस कारणी लावला. मात्र उद्याचा दिवस माझ्यासमोर आ वासून उभा होता. आता उद्या जर वीज आली नाही तर मी प्रशिक्षण पुढे नेऊ शकणार नव्हतो.

तिसरा दिवस उजाडला. वीज नाही पण एक नवीनच निरोप घेऊन सुभाष सकाळी सातलाच आला. “जुना लाईनमन बदलून गेला आहे. आणि नवीन आलेल्या माणसाला या भागातील विद्युत पुरवठा जोडणीची पुरेशी माहिती नाही” आता संगणक प्रशिक्षणाचे बारा वाजणार असे सुभाषच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट सांगत होती. निर्वाणीचा उपाय म्हणून माझ्याबरोबर नेलेला जुना बेसिक फोन काढला. सुदैवाने त्यातील बँटरी ठणठणीत होती. त्यातील लुकलुकणारी नेटवर्कची एक काडी हीच काय ती बुडत्याला आधार होती. त्या फोनच्या कॉन्टँक्ट लिस्ट मधील सर्वांना “ do you have twitter account? ” असा एक बल्क sms पाठवला. त्यांपैकी श्री.महेंद्र घरत,श्री.योगेश मुंगी,श्री.जितेंद्र तरटे आणि कु.भाग्यश्री भार्गवे यांनी त्वरित yes म्हणून reply केला. त्यांना मी दुसरा sms पाठवला.

”Please arrange to send further twitter msg to PM Mr. Narendra Modi and CM. Mr. Devendra Phadanvis >> “ MOST URGENT The first computer training in their life of 30 students is suffering due to no power supply in vanvasi area ( Akhada Dist. Palghar) since last three days. Please do needful”>>

हा माझा एक प्रयत्न होता. एव्हाना सकाळचे १० वाजले होते. प्रशिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्याची झालेल्या अभ्यासक्रमाची फक्त उजळणीच घेतली.  त्यानंतर सगळी मुले खेळायला निघून गेली. सगळीच अवस्था संभ्रमित असतांनाच एक अनपेक्षित घडले.. दुपारी सव्वा बारा वाजता मीटरवरचा लाल दिवा लख्ख उजळला. लाईट आल्याचा साऱ्या गावालाच आनंद झाला. आणि सगळे विद्यार्थी त्यांच्या जीवनातल्या पहिल्या वहिल्या कॉम्प्युटर प्रॅक्टिकलसाठी धावत पळत आले. लाईट आले आणि आता प्रशिक्षण पुढे सुरु राहणार हीच माझ्यासाठी आनंदाची बाब होती. पण मला आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा दोन लाईनमन्स मला शोधत दुपारी गावात आले आणि त्यांनी वीज पुरवठा सुरळीत सुरु असल्याची खात्री केली तसेच कॉम्प्यूटर प्रशिक्षणाविषयी चौकशी केली. प्रशिक्षण किती दिवस चालणार इ. माहिती घेऊन ते निघून गेले. त्यानंतर कॉम्प्युटर प्रशिक्षण पूर्ण होऊनही पुढील अनेक महिने आखाडा गावातील वीज गेली नाही असे तेथील गावकरी आजही सांगतात. अशा प्रकारे त्या दुर्गम गावातील ३० विद्यार्थ्यांनी बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग प्रॅक्टीकलसह माझ्या अपेक्षेपेक्षाही उत्तम प्रकारे पूर्ण केले.

माझ्यासह संपूर्ण आखाडा गावाने आणि मला twitter द्वारे मदत करणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांनीदेखील घेतलेला मोदी प्रशासनाचा हा संस्मरणीय अनुभव आपल्याशी share करतांना मला अतिशय आनंद होत आहे. मला इथे एक गोष्ट स्पष्टपणे नमूद कराविशी वाटते की, ही पोस्ट म्हणजे मोदींच्या कार्याची जाहिरात नाही. खरतर मोदींसारख्या व्यक्तीला जाहिरातीची गरजच नाही कारण मोदी ही व्यक्ती राजकारणी कमी आणि देशभक्त अधिक आहेत. त्यांचे खणखणीत कार्यच त्यांच्यासाठी पुरेसे आहे. परंतु एखादया दुर्गम गावातील तक्रारीची दखल घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करणे हा मोदी प्रशासनाचा मला आलेला अनुभव आपल्याशी share करावा असे मला मनापसून वाटले म्हणून मी हे आपणा सर्वांपर्यंत पोहोचवित आहे.

( पोस्ट मध्ये नमूद केलेली घटना, गाव, व्यक्तींची नांवे इ. सर्व माहिती खरी असून सुदैवाने त्यावेळचे सर्व sms माझ्या जुन्या फोनमध्ये सबूत गॅगसाठी शाबूत आहेत.)

सचिन दहिभाते, नासिक.

९४२३५३९१२३

दि. २१/०४/२०१९

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *